उरलेली अर्धी जागा cover

उरलेली अर्धी जागा

Text Size:
Page 1

लेखकाचे मनोगत

जय जगदंब!
​माझ्या प्रिय वाचकहो,
​‘लग्न’ म्हणजे दोन जीवांची गाठ, असं आपण नेहमी ऐकतो. पण कधीकधी ही गाठ फक्त मांडवात मारली जाते, मनांमध्ये नव्हे. आजकाल आपल्या अवतीभवती अशी अनेक घरं दिसतात, जिथे दोन माणसं एकाच छताखाली राहतात, एकत्र चहा पितात, एकत्र घराबाहेर पडतात... पण त्यांच्यात संवाद असतो फक्त जबाबदारीचा, प्रेमाचा नाही.

"उरलेली अर्धी जागा" हि अशाच एका शांत, तरीही अस्वस्थ करणाऱ्या नात्याची गोष्ट आहे.

​या कादंबरीचे नायक-नायिका, श्रेयस आणि शांभवी, आपल्याच परिचयाचे वाटावेत असे आहेत. श्रेयस वाईट माणूस नाही, पण तो त्याच्या भूतकाळाच्या अशा कोशात अडकलाय, जिथून त्याला बाहेर पडता येत नाहीये. तर दुसरीकडे शांभवी आहे, जी कोणत्याही तक्रारीशिवाय, अत्यंत संयमाने त्याच्या भूतकाळाशी कोणतीही स्पर्धा न करता तिथे उभी आहे.

​आपण अनेकदा आपल्या आयुष्यातून गेलेल्या माणसांच्या आठवणीत इतके अडकून पडतो, की वर्तमानात आपल्यासाठी उभं असलेलं जिवंत माणूस आपल्याला दिसेनासं होतं. आणि जेव्हा ते माणूस अचानक दूर जातं, तेव्हा कपाटातली आणि मनातली ती 'रिकामी अर्धी जागा' आपल्याला खाऊ उठते.

हि कादंबरी त्याच रिकाम्या जागेचा आणि तिथून सुरू होणाऱ्या एका सुंदर, हळुवार प्रेमाचा प्रवास आहे.
​ही कथा लिहिताना माझ्याही डोळ्यांत अनेकदा पाणी आलं. मला उमजलेलं नात्यांचं हे वास्तव मी या कादंबरीच्या रूपाने तुमच्यासमोर मांडत आहे. प्रेम हे नेहमी पहिल्या नजरेतच होतं असं नाही; काही वेळा ते एकमेकांच्या सहवासात, शांततेत आणि एका वळणावर येणाऱ्या पश्चात्तापातून हळूहळू उमलत असतं.

​शांभवीचा तो मूक संताप, श्रेयसची ती अपराधी भावना आणि शेवटी दोघांमध्ये झालेला तो संवाद... हे सगळं तुमच्या मनाला कुठेतकी नक्कीच स्पर्श करून जाईल, अशी मला आशा आहे.

​हि कादंबरी पूर्णत्वास नेण्यासाठी मला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली, प्रोत्साहन दिले, त्या सर्वांचा मी ऋणी आहे.

​माझी हि दुसरी साहित्यकृती मी तुमच्या हातात सुपूर्द करत आहे. वाचन करताना कादंबरीतील ती 'अर्धी जागा' तुमच्याही मनाचा ठाव घेईल आणि कदाचित, आपल्याच घरातल्या माणसाकडे नव्याने बघण्याची एक नवी नजर तुम्हांला देईल.

​कादंबरी कशी वाटली, हे मला नक्की कळवा.
तुमच्या प्रतिक्रियांची मी मनापासून वाट पाहत आहे.

​आपला नम्र,
लेखक
बालार्क..
(श्री मनोज जोशी बालमटाकळीकर)